कुंभकोणम हे नाव वाचले, की पुलंच्या असा मी असामी मधला प्रोफेसर कुंभकोणम आठवतो, त्या मॉडर्न गुरूदेवांची आरती एखाद्या म्हशीपासून ताटातूट झालेल्या रेड्याच्या आर्ततेने गाणारा. पण आज त्या गावाबद्दल थोडेसे. कुंभकोणम हे गाव चेन्नईपासून साधारण चारशे किलोमीटरवर आणि तिरुचिरापल्ली एअरपोर्ट पासून ९० किलोमीटरवर आहे. चेन्नईपासून रेल्वे किंवा बसने ६ तासाच्या प्रवासात आपण ह्या गावाला येतो.
प्रलय होताना ब्रह्मदेवाने सर्व जीव आणि अमृत कुंभात भरले आणि तो कुंभ कैलास पर्वतावर ठेवला. प्रलयात तो कुंभ वाहून समुद्राच्या दिशेला जात असताना शंकराने तो कुंभ जिथे फोडला आणि जीवसृष्टी पुन्हा निर्माण केली, ते ठिकाण म्हणजे कुंभकोणम. इथे गल्ली गल्ली मध्ये पुरातन आणि नवीन मंदिरे आहेत. पण त्यातही प्रसिद्ध म्हणजे इथले नवग्रह.
आता नवग्रह मंदिर तर बऱ्याच ठिकाणी आहेत. पण कुंभकोणमची खासियत म्हणजे इथली मंदिरे प्रत्येका ग्रहासाठी वेगवेगळी आहेत. ह्या प्रवासाला ‘नवग्रह सर्किट’ म्हणतात. हि मंदिरे बघण्याचा ठराविक असा काही क्रम नाही. नीट रांगेत केल्यास साधारण २५०-३०० किलोमीटरचा प्रवास घडतो. त्यातही काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जसे की
- रोज दुपारी एक ते चार सर्व मंदिरे बंद असतात.
- मंदिरे जरी ‘ग्रहांची’ म्हणत असू, तरी मूळ ती शंकराची किंवा इतर देवांची आहेत. ग्रहांसाठी बाजूला एक शाखा काढून दिलेली असते. पण त्याच शाखेमुळे आता त्या मंदिरांचा राबता वाढलेला आहे.
- मंदिराबाहेर काही पूजासाहित्य घेतले की आत ‘अर्चना’ म्हणून पाच एक रुपयाची पावती फाडावी लागते. ती दाखवल्यानंतर तिथला भटजी ती पूजा देवाला अर्पण करून तुम्हाला प्रसाद परत देतो.
- पूजासाहित्य बाहेरच घेतले पाहिजे असे काही नाही, बऱ्याच वेळेला आत मंदिर ट्रस्ट देखील पूजा साहित्य विकते.
- तिथे जाताना तुमचे नक्षत्र न विसरता माहित करून घ्या. प्रत्येक वेळी भटजी तुम्हाला तुमचे नाव आणि नक्षत्र विचारतो.
- हिंदी किंवा इंग्रजी कळणारे इसम विरळ. पण तरी लोक मदत करणारे आहेत.
- बहुतांश हॉटेल्स हि केवळ साऊथ इंडियन खाद्यपदार्थ बनवतात. त्यामुळे काही दिवस फक्त आंबवलेल्या पीठाचे पदार्थ खायचे आहेत हि मानसिक तयारी असू द्यावी.
- काही मंदिरांमध्ये बाहेर तेलाचे दिवे विकत असतात, तर काही ठिकाणी तुपाच्या छोट्या बाटल्या. प्रत्येका मंदिराचे पूजा साहित्य – जसे धान्य, कपड्याचा रंग, फुले वैगेरे – वेगवेगळे आहेत. पण सर्व सोय उपलब्ध आहे, हॉटेल वरून काही न्यावे लागत नाही. तिथे दिवे लावण्याची प्रथा असेल तर दिवे लावण्यासाठी एखादा कोनाडा नेमलेला असतो. तूप विकत असतील, तर ते तूप दिव्यात वाहण्यासाठी आत व्यवस्थित सोय केलेली असते. एकंदर आत गेल्यानंतर भाषेचा विशेष काही प्रॉब्लेम येत नाही.
- १० रुपयाच्या नोटा आणि भरपूर नाणी सोबत असू द्यात.
नवग्रहांची ठिकाणे आणि नकाशा खालील प्रमाणे:
शेवटी आपण परत कुंभकोणमला परततो, पण गूगल च्या नकाश्याच्या मर्यादेमुळे शेवटचा प्रवास दिसत नाही आहे.
काही महत्वाकांक्षी पर्यटक एकाच दिवसात सगळी मंदिरे करू पाहतात, पण हे दर्शन म्हणजे एकतर देखल्या देवा दंडवत असते, आणि खूप दमछाक करणारे असते. पुन्हा एक ते चार बंद, दिवसातून वेगवेगळ्या वेळी होणाऱ्या आरत्या आणि अभिषेक अशाने दर्शनाचा वेळ लांबतो. त्यापेक्षा निदान दीड-दोन दिवसांचा प्लॅन करावा. त्या वेळेत तुम्ही तंजावूर आणि जमल्यास लोकल साईट सीइंग सुद्धा करू शकता.
खालील प्रमाणे दोन दिवस प्लान करावेत:
दिवस १: कुंभकोणमची पश्चिम दिशा :
पहिल्या दिवशी तंजावूर पाहून येणे नकाशानुसार योग्य ठरते. तंजावूरला पाहण्याची प्रमुख ठिकाणे दोन. एक म्हणजे तेथील बृहडेश्वर नावाचे सुंदर कोरीव कामाचे आणि अजस्त्र नंदी आणि पिंड असलेले महाकाय मंदिर, आणि दुसरे म्हणजे राजवाडा परिसर. मंदिरे जरी १-४ बंद असतील, तरी मंदिर परिसर चालू असतो. त्यामुळे आतील मंदिर प्रथम पाहून मग बाकी परिसर आणि इतर ठिकाणे पहावीत. साधारण ३-४ तासामध्ये तंजावूर पाहून होते.
दिवस २: कुंभकोणमची पूर्व दिशा :
काही मंदिरांची खासियत:
- राहू मंदिर: येथे सकाळी ९.३०ला आणि राहूकालात दुग्धाभिषेक केला जातो. तुम्हाला प्रत्येकी रु.१००- रु.२५० किंवा रु.३५० चे तिकीट घेऊन रांगेत उभे राहावे लागते. नंतर भटजी एक छोटे भांडे घेऊन प्रत्येकासमोर आणून त्याचे नाव व नक्षत्र विचारतो. बहुधा इतक्या लोकांनी वर्गणी दिली आहे असे देवास सांगत असावा. नंतर तुम्हाला राहू मंदिरासमोरील जागेवर बसवतात, आणि तुमच्या समोर दुग्धाभिषेक केला जातो. इथे कोणत्याही मंदिरात देवाला हात लावू दिला जात नाही.
- मंगळ मंदिर: इथली एक प्रथा रंजक आहे. मंगळ मंदिरासमोर जमिनीवर पायाचे निरनिराळया मापाचे ठसे आहेत. आपल्याला बरोबर बसणाऱ्या ठश्यावर उभे राहून मंगळ देवाकडे पहात मीठ, मोहरी आणि गूळ आपल्या डोक्यावरून क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ओवाळून टाकले की त्वचेचे रोग बरे होतात अशी समजूत आहे. तसेच इथे नाडी भविष्य सांगणाऱ्या लोकांची संख्या अमाप आहे. बाहेर ज्योतिष्यांच्या दुकानांवर पी.एच.डी., एम.ए. काय वाट्टेल त्या पदव्या लावलेल्या आहेत. आता खरे खोटे ओळखणे आणि योग्य मार्गदर्शन मिळवणे हे आपल्या नाशिबाचे खेळ!
- सूर्य मंदिर: तिथले सर्वात जास्त गजबजलेले मंदिर. ह्या मंदिरात सर्व नऊ ग्रहांची मंदिरे असल्याने कदाचित सर्वात जास्त गर्दी येथे होत असेल. इथे मंदिर प्रांगणात अन्न बनवत असलेल्यांकडे ऑर्डर दिल्यास ते बाहेर बसलेल्या गरिबांना अन्न वाटप करण्यासाठी पाकिटे बांधून देतात. इथेली प्रथा म्हणजे पहिले आतमध्ये शिरल्यानंतर उजव्या हाताच्या मंदिरात गणपतीचे दर्शन घेणे, नंतर सूर्य आणि बाकी ग्रहांचे दर्शन घेणे, मग पुन्हा गणपती दर्शन घेणे, आणि शेवटी सर्व मंदिराला (पर्यायाने सर्व ग्रहांना) ९ प्रदक्षिणा मारणे. प्रदक्षिणा झाल्यानंतर शेवटचे लोटांगण मंदिराच्या दिशेला न घालता उत्तर दिशेला तोंड करून घालतात.
- गुरु मंदिर: मंदिरात खूप दिवे आहेत. इथे गुरुमंदिरासमोरील दिव्याला तूप घालण्याची प्रथा आहे.
कुंभकोणम जरी मंदिरांचे गाव असले, तरी तेथील प्रमुख मंदिरे थोडीच आहेत. खालील नकाशात कुंभकोणमचे लोकल साईट सीइंग पहा.
हे स्थलदर्शन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एखाद्या रिक्षावाल्याला पकडणे. साधारण रू.३५० – ४५० मध्ये सर्व स्थळे सुखात बघून २ तासांमध्ये आपण परत हॉटेल वर येऊ शकतो.
खरेदीचे वेड असणाऱ्यांसाठी तंजावूर मध्ये तंजावूर पद्धतीच्या रंगीत कलाकृती (पेंटिंग) आणि कथकली च्या वाऱ्यावर डुलणार्या बाहुल्या मिळतात. कुंभकोणम मध्ये पितळेची दाक्षिणात्य भांडी व देवाचे दागिने मिळतात.ऐरावतेश्वर मंदिराशेजारील वस्तीमध्ये घराघरामध्ये रेशमी साड्या विणतात. बायकोवर जास्त आणि पैशांवर कमी प्रेम असणाऱ्यांसाठी साडीखरेदीसाठी योग्य ठिकाण आहे.
वर दिलेल्या मार्गदर्शनाने तुम्ही ३ दिवसांमध्ये सर्व नवग्रह मंदिरे, तंजावूर आणि कुंभकोणमची महत्वाची ठिकाणे अगदी नीट बघू शकता. कुंभकोणम व बाजूच्या ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी माझे मित्र कल्याण जोशी यांचा ब्लॉग देखील नक्की वाचा: