अनेक शिवभक्त त्रंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीची फेरी करतात. वर्षभर हि फेरी करता येते, पण श्रावणातल्या सोमवारी – विशेषतः तिसऱ्या सोमवारी हि फेरी करण्याचे खास महत्व आहे. पण ह्या तिसऱ्या सोमवारी अमाप गर्दी लोटलेली असते, त्यामुळे बाकी सोमवार धरून गेल्यास शांतपणे फेरी होऊ शकते.
मी सुद्धा हि फेरी कित्येक वेळा केलेली आहे. फेरी करताना मला जाणवायचं कि लोक उत्सुकतेने, भक्तीने फेरी करतात खरी, पण कित्येकांना ह्याची पद्धत नीट माहिती नसते. ह्या पोस्ट मध्ये आपण ह्या फेरी बद्दल थोडेसे जाणून घेऊ.
ब्रह्मगिरी पर्वत हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे, आणि ह्याच फेरीमध्ये ज्ञानदेवांचे मोठे बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ ह्यांना नाथसांप्रदायी साधू गहिनीनाथ ह्यांच्याकडून दीक्षा मिळाली होती. फेरी करण्याचे दोन मार्ग आहेत, एक लहान फेरी – जी गौतमाच्या डोंगरावरून परत त्र्यंबकेश्वरला येते. दुसरी मोठी फेरी, जी हरिहर गडावरच्या गौतम ऋषींच्या आश्रमातील कुंडावरून करण्यात येते. पहिली फेरी साधारण २० किलोमीटर ची आहे, आणि दुसरी साधारण ४० किलोमीटरची. सर्वसाधारण सांसारिक भाविक पहिली फेरी करतात, आणि जे भाविक मोक्ष मार्गाची कास धरतात ते दुसरी फेरी करतात. माझा अनुभव पहिल्या फेरीमार्गाचा आहे.
त्र्यंबकेश्वरला तीर्थराज कुशावर्त म्हणून एक लहानगे चौकोनी कुंड आहे, त्यात तीन वेळा डोके बुडवून डुबकी मारावी, आणि ओल्या अंगाने सुरुवात करावी. कुशावर्तावरून त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरून जाताना कळसाला नमस्कार करावा, मनोमन श्रीशंकराला साद घालावी आणि सरळ रस्ता धरावा. दर्शनासाठी थांबण्याची आवश्यकता नाही. गुरुमंत्र, आवडते इतर मंत्र, शंकराचे ध्यान, किंवा नामस्मरण करणे सुरु करावे. हि फेरी गौतमाच्या मंदिरापर्यंत जाऊन परतते, त्यामुळे ते मंदिर येईपर्यंत गप्पाटप्पा शक्यतोवर नको. गौतमाच्या डोंगराच्या पुढचा प्रवास हा गप्पांमध्ये करावा, तोपर्यंत साधनेची कास धरावी.
तिथून सरळ बाहेर पडल्यानंतर नाशिक च्या दिशेचा रस्ता धरावा. थोड्या अंतरावर उजव्या हाताला प्रयागतीर्थ नामक कुंड लागते.
त्या कुंडाला दोन्ही बाजूला पायऱ्या आहेत. त्या कुंडाला प्रदक्षिणा घालावी, आणि दोन्ही बाजूंच्या पायऱ्यांवरून उतरून पाण्यात पाय टाकून कुंडास आणि पायऱ्यांवरील मंदिरास नमस्कार करावा.
हि प्रदक्षिणा घातली, कि उजवीकडील पेगलवाडी मार्गे जाणारा घोटी मार्ग पकडावा.
हा रस्ता संपूर्ण डांबरी आहे. वर नजर टाकली तर ब्रह्मगिरी च्या अंगाखांद्यावर नांदणारे ढग थकवा पळवून लावतात. इथून एक तासाभरात उजवीकडे जाणारा रस्ता येतो. उजवीकडे वळलात कि लगेचच तुम्हाला उजव्या हाताला एक वस्ती लागते. त्या वस्तीमध्ये विचारा कि ‘शबरीचे मंदिर कुठे आहे’?
हे लहानसे पुरातन मंदिर अगदी शेतामध्ये लपले आहे. सिमेंटच्या रस्त्यावरून आत गेल्यानंतर शेतामधून जावे लागते. ह्या रस्त्यावर चपला बूट उपयोगी नाहीत. चिखलात पाय टाकत हा रस्ता धुंडाळावा लागतो. नाहीतर तिथे बाहेरच्या चहाच्या टपरीवर कोणी रिकामे असेल तर त्याला सोबत न्यावे, आणि त्यास काही बिदागी द्यावी.
शबरीचे मंदिर माझ्या बोटाच्या दिशेला आहे, झाड आणि घरामध्ये लपलेले. त्याचा दगडी कळस जेमतेम दिसतो आहे.
एकदा शबरी मंदिर झाले, कि पुन्हा डांबरी सडकेवरून चालणे सुरु करावे. थोडे पुढे गेल्यावर एक गाव गेल्यानंतर उजवीकडे एक तळे लागते, ज्याला लागून सिमेंटचा एकपदरी रस्ता जातो. हा फेरीमार्ग आहे.
काही वर्षांआधी इथून आम्ही शेतामध्ये उतरायचो, आणि चिखलातून मार्गक्रमणा करायचो. पण आता सरकारने अतिशय उत्तम असा सिमेंटचा पायी चालण्यासाठी मार्ग बनवला आहे. जेमतेम एक पदरी असल्यामुळे वाहनांना येथे प्रवेश नाही, पण चालण्यासाठी मात्र हि उत्तम सोय आहे.
रस्त्यामध्ये वैतरणा नदीवरचा एक पूल पार कराल, ज्याच्या अखेरीस एक गणपती मंदिर आहे. नदीकाठच्या ह्या छोट्याश्या मंदिराचे दर्शन घेऊन मार्गस्थ व्हावे. शेजारच्याच वैतरणा नदीमध्ये थोडा श्रमपरिहार देखील करता येईल.
ह्या रस्त्यावरून घाट सदृश्य चढण पार केल्यानंतर गौतमाच्या डोंगराच्या पायथ्याशी हा रस्ता अकस्मात संपतो, आणि इथून ट्रेक सुरु होतो. आधीच्या काळी हा रस्ता शेतातून आणि चिखलातून येत असल्यामुळे जरा तरी वॉर्मअप व्हायचा, पण आता चांगल्या सडकेवरून थेट ट्रेक सुरु होत असल्यामुळे थोडा मानसिक धक्का बसतो!
(मी मधल्या वारी गेलो असल्या कारणाने ह्या फेरीमार्गावर गाडी नेण्याची हिंमत केली. फेरीच्या दिवसामध्ये याचा विचारही करू नका. एकपदरी रस्ता असल्यामुळे गाडी उलट फिरवण्यासाठीदेखील जागा नाही, आणि बऱ्याच वेळ गाडी रिव्हर्स आणल्यानंतर मला यु-टर्नसाठी जागा सापडली. रस्त्यावर भाविकांची गर्दी असल्यास गाडी बिलकुल जाऊ शकणार नाही.)
ह्या गौतम डोंगराच्या वर गौतम ऋषींनी स्थापिलेले मंदिर आहे. मंदिराचे दर्शन घेतले, कि तुमची अर्धी फेरी संपली. आता फक्त ‘परतणे’ शिल्लक. डोंगर उतरताना निसरड्या दगडांमुळे सांभाळून उतरावे लागते. पुढचा आपला रस्ता हा आदिवासी पाड्यांमधून येतो. इथे अमाप गरिबी आहे, त्यामुळे शक्य झाल्यास इथे कपडे, पेन, पेन्सिल नक्की द्यावेत.
परतीच्या रस्त्यावर डांबरी सडक लागल्यानंतर छोटी छोटी देवळे रस्त्यात लागतात. त्यांच्या दर्शनाचा लांबूनच आनंद घेत घेत आपण परत त्रंबकेश्वर मंदिरापुढे पोहोचतो. पाच सहा तासापूर्वी आपल्याला अलविदा करणारा शंकर आता आपले प्रेमाने स्वागत करीत असतो, ख्यालीखुशाली विचारात असतो. ठुसठुसणारे पाय आणि तृप्त मनाने आपण तुडुंब भरलेले असतो. मंदिरासमोर उभे राहून पुन्हा कळसाकडे पाहून दर्शनाचा आनंद घ्यावा, मनोमन श्रीशंकराचे आभार मानावेत, आणि आपल्या निवासस्थानाचा रस्ता धरावा.
काही सल्ले:
- थोडक्यात: पहाटे पाचच्या सुमारास निघणे – तीर्थराज कुशावर्तात डुबकी – त्र्यंबकेश्वर मंदिरास नमस्कार – प्रयागतीर्थास प्रदक्षिणा – शबरीचे मंदिर – वैतरणा गणेश – गौतमाचा डोंगर – पुन्हा त्र्यंबकेश्वर मंदिर
- फेरी करताना कित्येक लहान मुले ‘खाऊ द्या नाहीतर पैसे द्या’ म्हणत मागे लागतात. कित्येक वर्षांची हि परंपरा आहे, आणि ह्यात दानापेक्षा कौतुकाची भावना जास्त आहे. अगदी लहान बाळे देखील समोर येतात! या बालसेनेसाठी काही खाऊ, पेन्सिल, रबर वैगेरे शालेय सामान नक्की न्यावे.
- गौतम डोंगराच्या पुढच्या आदिवासी पाड्यांमध्ये भीषण गरिबी आहे. तिथल्या आपल्या माई-भगिनींसाठी साड्या वैगेरे कापडे शक्य झाल्यास सोबत न्यावी.
- बरेच भाविक फेरी अनवाणी करतात, पण आधी शेतातल्या चिखलात पाय टाकल्यावर थंड वाटायचे, तसे आता पक्क्या सडकेवर पाय घासताना वाटणार नाही, त्यामुळे हा निर्णय वैयक्तिक घ्यावा.
- सर्वात महत्वाचे: हि फेरी शारीरिक क्षमतेचा कस बघणारी आहे. आता जरी बराचसा रस्ता डांबरी आणि सिमेंट चा झाला आहे, तरी ५-६ तास सलग चालणे, आणि गौतमाचा डोंगर चढून उतरणे ह्या गोष्टी थोड्या कठीण आहेत. शेवटी ईश्वरभक्तीचे अनेक मार्ग आहेत, तेव्हा स्वत:च्या शरीराचा कल पाहून फेरीचा निर्णय घ्यावा.
Namaskar, Lekh awadla. Me pradakshina karanyacha vichar kela mhanun margadarshak lekh shodhat hote. Chhan ahe lekh, majhya baryachshya prashnanchi uttara milali. Ani tumacha likhanahi uttam. 🙂
LikeLike