दत्तांचे गुरु – भाग २

९. अजगर:

अजगर कधी असे म्हणत नाही, कि आजचा उंदीर तिखट होता, आजचे सावज गोड होते. जे समोर येईल ते गिळतो. तसेच योग्याने जे समोर येईल, जे घडेल, त्याचा स्वीकार करावा.

आजच्या भाषेत: ‘Accept’ करावे ‘react’ करू नये.

१०. समुद्र

जगभरातील नद्या अखेरीस समुद्रात येऊन रित्या होतात. पावसाचे पाणी, पर्वतांचा बर्फ जगप्रवास करून शेवटी समुद्रास येऊन मिळतात. पण समुद्र कधी ओसंडून वाहून जग बुडवीत नाही, किंवा आटून देखील जात नाही. कायम लाटांवर हेलकावे जरी खात असेल, तरी मर्यादा ओलांडत नाही.

अश्या प्रकारे समुद्र आपल्याला ‘स्थितप्रज्ञता’ शिकवतो.

आता मनुष्याच्या अति प्रगतशीलपणामुळे समुद्राची स्थितप्रज्ञता ढळत आहे. सुनामी, सागरी बेटे गिळंकृत करणे असल्या प्रकाराने समुद्र आता त्याचे गुण बदलत आहे. पण वरील वर्णन हे त्याचे गेल्या हजारो वर्षांच्या अनुभवाचे आहे, गेल्या काही दशकांच्या रूपाचे नाही.

११. पतंग कीटक:

अग्नी सर्वांसाठीच दाहदायक असतो. पण त्याचे मोहक रूप पतंग किटकाला इतके भुलवते, कि आगीची धग देखील त्याच्या धावेच्या आड येत नाही. चटके बसून देखील केवळ मोहापायी पतंग अग्नीमध्ये स्वत:ला झोकून देतो आणि अंतास कारणीभूत होतो.

पतंग आपल्याला विषयांचा अतिरेक केल्यास स्वत:चा अंत ओढवून घेतला जातो हे शिकवतो.

१२. मधमाशी

मध गोळा करण्यात मधमाशीचे कष्ट जगप्रसिद्ध आहेत. हजारो मधमाश्या अनेक महिने झटून मधाचा मोठा साठा करतात, पण ते मोठे पोळे एक दिवस मध काढणारा माणूस येऊन काढून नेतो.

अति संचय केला तर एक दिवस सर्वच गमवावे लागते, आणि पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागते. म्हणून गरजेएवढेच जमवावे. “अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा।”

(कधी कधी अध्यात्म हे गुंतवणुकीच्या विरुद्ध सल्ला देते!)

१३. हत्ती

जंगली हत्ती हे खूप ताकदवान असतात. इतक्या प्रचंड ताकदीच्या आणि बुद्धिमत्तेच्या प्राण्याला पकडण्यासाठी शिकारी जंगलात मोठे खड्डे खोदतात, आणि पाळीव हत्तीणीला खड्ड्याच्या पलीकडे उभे करतात. त्या हत्तीणीला पाहून हत्ती चेकाळून तिच्या दिशेला धावत सुटतो, आणि खड्ड्यात पडून पकडला जातो.

हत्ती आपल्याला शिकवतो कि वासनांवर ताबा नसेल तर थोरामोठ्यांचे देखील अध:पतन होते. “अती विषयी सर्वदा दैन्यवाणा।”

१४. भुंगा

कमळ त्याच्या रंगाने आणि सुगंधाने भुंग्याला आकर्षित करते. कमळाच्या आकर्षणात गुंग होऊन भुंगा त्यावर बसतो आणि संध्याकाळ झाली, की कमळ आपल्या पाकळ्या मिटून घेते. तेंव्हासुद्धा भुंगा त्याच्या नादात इतका रंगला असतो, कि आपण बंदी झालो हि जाणीव देखील त्याला होत नाही.

मिटता कमलदल होई बंदी भृंग । तरि सोडिना ध्यास, गुंजनात दंग ॥

भुंगा आपल्याला शिकवतो की कोणत्याही गोष्टीच्या अति आहारी गेल्याने तर शेवटी आपण त्या गोष्टीचे बंदी बनतो.

आजच्या भाषेत सांगायचं तर ‘एकच प्याला’, ‘एक डाव’, ‘पहिली सिगारेट’ कितीही मोहक वाटली, तरी त्याची चटकन सवय लागते, सवयीचे रुपांतर व्यसनात होते आणि ते व्यसन मनुष्याला आपला बंदी बनवतं. 

१५. हरीण

हरीण अतिशय चंचल असते. बाणाने त्याचा वेध घेणे हि जवळपास अशक्यप्राय गोष्ट. स्वत:च्या दूरचा वेध घेणाऱ्या तीक्ष्ण कानांनी ते शिकाऱ्याचा अंदाज घेते आणि वायुवेगाने पळते. पण संगीत हे हरणाचा मर्म-बिंदू (weak-point)  असते. शिकारी बासरीमधून मधुर सूर छेडतो, आणि ते संगीत ऐकत हरीण जागच्या जागीच थिजते, आणि शिकाऱ्याच्या बाणाचा निशाण होते.

हरीण शिकवते कि कोणत्याही गोष्टीला आपला ताबा घेऊ देणे अंती स्व-नाशाचे कारण ठरते.

१६. मासा

नदीमध्ये बागडणारा मासा जेव्हा गळाला लागतो, तो का लागतो? नदीमध्ये अन्न नाही म्हणून? कि गळ सोन्याचा असतो म्हणून? जरी माश्याच्या सर्वत्र अन्न असले, तरी त्याला गळाला लावलेल्या भक्ष्याची वर-खाली होणारी हालचाल मोहून घेते. गळ माश्याला शोधत जात नाही, मासा मोहक हालचालीच्या उत्कंठेने गळाला शोधत येतो.

आयुष्यात अनेक गोष्टी आपले मन मोहून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. साधक अशा कोणत्याही मोहाला बळी पडला, तर त्याचे अध्यात्मिक जीवन खुंटते.

दत्तगुरूंचे शेवटच्या आठ गुरूंची माहिती पुढच्या भागामध्ये!

 

1 Comments Add yours

यावर आपले मत नोंदवा