मोबाईल फोनची क्रांती झाली, आणि कॅमेरा हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला. जुन्या काळी आजोबा पणजोबांचे आयुष्यभरात अतिशय मोजकेच फोटो असायचे, ते देखील बहुधा भिंतीवर लावण्याच्या सोयीसाठीच. आधी फोटो काढणं खर्चिक आणि वेळ खाऊ होतं. रोल विकत आणा,कॅमेरा नीट वापरा, रोल डेव्हलप करा, प्रिंटचे पैसे मोजा आणि मग कळायचं कि अरेच्चा, आपण तर डोळे मिटले कि ह्या फोटोत! मग तसाच आपला अर्धवटराव स्टाईल फोटो पिढ्यानपिढ्या अल्बम मध्ये राहणार.
डिजिटल कॅमेऱ्याने बरीचशी मेहनत सोपी केली, आणि मोबाईल कॅमेऱ्याने तर कमाल केली. इतर वेळी ज्यांच्याकडे साधा पासपोर्ट फोटो देखील नसायचा, असल्यांकडे रोज डी.पी. साठी वेगवेगळे कलेक्शन जमा होऊ लागले.
ह्याचा फायदा म्हणजे आता कुठेही गेलो तरी फोटो हा निघतोच. माझे पण भरपूर फोटो जमलेत आतापर्यंत केलेल्या भटकंती मधले. पण हे फोटो बघताना अचानक मला जाणवलं, कि छायाचित्र आले, पण क्षण मात्र निसटून गेले. किनाऱ्यांवरच्या फोटोंमध्ये तो खारा वारा कुठे झोंबतो नाकाला? ट्रेन मधल्या सेल्फीतून गाडीच्या रूळांची धडधड कुठे जाणवते? आपण फक्त एक पुरावा गोळा करतो, कि हा क्षण मी जगलो. पण ज्या गोष्टींनी तो क्षण सार्थ केला, त्या गोष्टी मात्र काळाच्या ओघात हरवून जातात. उरतं ते फक्त शून्य आणि एक च्या भाषेतील डिजिटल स्टोअरेज.
फोटो काढताना मी काय अनुभवलं हे पुन्हा पुन्हा जगता यावं म्हणून एक नवा प्रकल्प:
शब्दचित्रे
ज्यांमध्ये फोटोसोबत आजूबाजूचे विश्वही माझ्या तोडक्या मोडक्या शब्दांमध्ये पकडण्याचा प्रयत्न करेन.