त्र्यंबकेश्वर हे स्थान भारतातील बारा ज्योतिर्लिंगामधील एक आहे. माधवराव पेशव्यांनी १७७५ च्या सुमारास ह्या भव्य मंदिराचे पुनर्निर्माण केले. ‘ब्रह्मगिरी’ नामक विशाल डोंगराच्या कुशीत वसलेले त्र्यंबकेश्वर हे छोटेसे गाव अध्यात्माचा मोठा वारसा बाळगून आहे. कित्येक पंथांची मठ-मंदिरे, तसेच कालसर्प योग, नारायण नागबळी शांती असल्या धार्मिक कार्यांनी कायम गजबजलेले हे गाव शतकोनुशतके भाविकांना आपल्याकडे खेचून आणते आहे.
इथली एक प्रथा म्हणजे ह्या विशाल ब्रह्मगिरी पर्वताला फेरी घालणे. वर्षभर ही फेरी घालता येते, पण विशेष करून श्रावणातले सोमवार, त्यातही तिसरा सोमवार हा ह्या फेरीसाठी अतिशय पवित्र मानला जातो. श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी लाखो भाविक ह्या ब्रह्मगिरीला फेरी घालतात.
मी ही फेरी पहिल्यांदा केली २००४ साली. त्या वेळी मला फक्त फेरीमधल्या महत्त्वाच्या टप्प्यांची नावे माहित होती. नाशिक मध्ये राहणाऱ्या एका मित्राने मला नाशिकवरून मोटारसायकलवर टाकलं आणि त्र्यंबकला आणून सोडलं. इथली तिथली ओळख काढून शेवटी एका कापड दुकानाच्या मालकीणबाईंच्या खोलीवर सोय झाली. रात्री गावात फिरून फेरीच्या रस्त्याचा अंदाज घेऊ लागलो. ज्यांना ज्यांना विचारलं त्यांचा पहिला प्रश्न होता “किती लोक आहेत ग्रुप मध्ये?” “मी एकटाच!” हे उत्तर ऐकल्यानंतर बहुतांश लोकांनी मला “मंदिराचं दर्शन घे आणि जा घरी” हाच सल्ला दिला. एकदोघांनी फक्त सांगितलं कि “रस्त्यात फेरी करणारी माणसे दिसतील त्यांच्या मागे मागे जा. चुकलास कि विचार.” मी म्हटलं सगळंच टेन्शन मीच घेतलं तर त्या शंकराला काय शिल्लक राहील?! त्याच्यावरच भरोसा टाकून मी सकाळी ५ च्या अंधारात फेरी सुरु केली. देवकृपेने कुठेही न चुकता परतलो.
पुढल्या वर्षी तर कहर झाला. फेरीला पुन्हा एकटाच आलो होतो, त्याच घरात राहिलो होतो. त्या वेळी मोबाईलचं प्रस्थ नव्हतं. त्यामुळे फेरीला पहाटे निघण्यासाठी मला उठवायला मी घरमालकांवर निर्भर असायचो. पण त्या वर्षी त्या मालकीणबाईंच्या गुडघ्याचा काही प्रॉब्लेम निघाल्याने त्यांना मला त्या पहिल्या मजल्यावरच्या खोलीवर येऊन उठवता येणार नव्हते. काही लोक त्यांच्या डोक्यातल्या अलार्मने परफेक्ट ठरवलेल्या वेळेवर उठतात. पण असल्या लवकर उठणाऱ्या लोकांमध्ये माझी गणती कधीच झाली नाही. त्यामुळे आता मानवी अलार्म नाही तर उठणार कसे?
मी ठरवले मानवी नाही तर नैसर्गिक घड्याळ वापरू! रात्री भरपूर पाणी पिऊन झोपलो. जाग आली, हातातल्या घड्याळात पाहिले तर साडेपाच वाजले होते. ‘उशीर झाला’ या विचाराने पटापट आवरून निघालो. रस्ता कापत असताना मला गर्दी फारच कमी आहे असं जाणवत होतं, आणि वाटत होतं कि आपल्याला निघायला उशीर झाला आणि बाकी भाविक बरेच पुढे निघून गेले. पण चालता चालता सूर्याचा जो अंदाज यायला पाहिजे होता तो काही येत नव्हता. अंधार काही सरत नव्हता. पावसाचे दिवस असल्याने हातात घड्याळ देखील नव्हतं, आणि कोणाला विचारू म्हणावं तर चिटपाखरू देखील दिसेना. बऱ्याच पुढे आल्यानंतर देखील निबिड अंधार बघून मला थोडी शंका आली, आणि रस्त्यातल्या एका चहा टपरीवर विचारले किती वाजलेत, तर कळलं रात्रीचे ३ वाजले होते! आपलं घड्याळ उलटं पाहिलं कि इंग्लंडची वेळ कळते हे माहित होतं. माझ्या त्या वेळच्या चायनीज रिस्टवॉचमध्ये ब्रँडचं नावही नव्हतं आणि आकडेही नव्हते. फक्तच सफेद तुळतुळीत डायलवर काटे आणि तासांच्या ठिकाणी डॉट होते. त्यामुळे झोपेत मी उलटं घड्याळ बघितलं आणि रात्रीच्या १२ वाजण्याच्या वेळेला पहाटेचे ५.३० समजून निघालो होतो! स्वतःच्या ह्या वेडेपणावर हसावं कि रडावं हे मला कळेना. प्रवासदेखील इतका झाला होता कि मागे फिरणंसुद्धा शक्य नव्हतं. दिवसाप्रकाशात फेरी होईल या विचारामुळे टॉर्च वैगेरे काही प्रकार सोबत नव्हतेच.
शेवटी म्हटलं त्र्यंबकेश्वरा, प्रकाश दाखव रे बाबा! जे कोणी थोडे भाविक रात्रीच्या तयारीने निघाले होते, त्यांच्याकडील टॉर्चच्या उधार मिणमिणत्या प्रकाशावर गौतमाचा डोंगर अंधारात अनवाणी ठेचकाळत पार केला, आणि कित्येक वेळा त्या निसरड्या शेतरस्त्यावरून आपटत धोपटत शेवटी पहाटेच्या सुमारास परतलो. साधारणपणे ज्या वेळेला फेरी सुरु करतात, त्या वेळेला मला परतलेलं बघून स्वत: त्र्यंबकेश्वर देखील मिश्कील हसला असेल.
पुढे हि फेरी पत्नी सोबत, मित्रांसोबत देखील केली. प्रत्येका वेळी अतिशय सुंदर अनुभव आला.वर्षभर प्रदूषणात, गोंगाटात कामासाठी जीव थकवल्यानंतर एक दिवस प्रसन्न शांततेत भक्तीमध्ये केलेली पायपीट हि हवीहवीशी वेदना वाटू लागली.
पण नंतर नंतर च्या वर्षांमध्ये फेरीमधल्या शेतातल्या रस्त्यावर अणकुचीदार खडी असायला लागली, जी अनवाणी पायांना अगदीच त्रासदायक होऊ लागली. शेवटी २०१२ ला त्र्यंबकेश्वराला सांगितलं, कि बाबा रे, हि शेवटची फेरी. या पुढे रस्ता झाल्यावर भेटू.
ह्या वर्षी मी पाहिलं कि फेरीचा रस्ता बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे. चिखलाच्या रस्त्यात पायपीट करण्याचे योग बरेच कमी झालेले आहेत, आणि ज्या टोकदार खड्यांनी आम्हा फेरीवाल्यांचे तळपाय सोलवटून काढले ते आता छान सिमेंट चे बनलेले आहेत. आधीपेक्षा आता हि फेरी खूप ‘एक्सेसिबल’ झालेली आहे. त्यामुळे पुढल्या पोस्ट मध्ये आपण हि फेरी कशी करावी याबद्दल बोलू.
Photo courtesy: By Coolgama – Own work, CC BY-SA 4.0, Link