नाशिकजवळ वसलेले त्र्यंबकेश्वर देवस्थान तेथील ज्योतिर्लिंगासाठी आणि धार्मिक विधींसाठी जगप्रसिद्ध आहे. ज्या ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत हे गाव वसलेले आहे, त्या पर्वतावर देखील महत्वाची देवस्थाने आहेत. तेथील ‘गंगाव्दार’ या ठिकाणी जायचा योग यंदाच्या श्रावणात आला.
ब्रह्मगिरी हे गोदावरी नदीचे उगमस्थान. पण येथे उगमस्थानी बालरूपातील श्री गोरक्षनाथ आले असताना त्यांनी गोदावरीस ‘गंगा’ असे संबोधले, तेंव्हापासून गोदावरी नदीच्या उगमस्थानाला ‘गंगाव्दार’ म्हटले जाऊ लागले.
हा उगम नील पर्वताच्या एका मंदिरात गोमुखातून होतो. ह्या गंगाव्दाराला जायचे दोन मार्ग आहेत. पहिला त्र्यंबक गावामधून सुरु होतो, जो साडेसातशे पायऱ्यांचा आहे. दुसरा मार्ग ८ किलोमीटर दुरून सुरु होतो, ज्यात फक्त १०० पायऱ्या चढून जाव्या लागतात. त्र्यंबक गावामधून या गाडीतळाच्या मार्गासाठी रिक्षा मिळू शकतात, किंवा स्वत:ची गाडी सुद्धा अगदी आरामात या गाडीतळापर्यंत जाऊ शकते.
शेवटचे काही किलोमीटर थोडा किचकट घाट आहे, नवीन ड्रायव्हरसाठी थोडा कठीण होऊ शकतो.
गाडीतळापासून आपला पायी प्रवास साधारण एक किलोमीटर कच्च्या रस्त्यावरून होतो. आम्ही पावसाळ्यात गेलो, तेव्हा हा रस्ता मध्ये मध्ये खूपच चिखलाचा आणि निसरडा होता. पण निसर्ग चहुबाजूने सौंदर्याची उधळण करत होता.
वर माकडांची फार भीती घालतात, आणि काही लोकांचा अनुभव देखील आहे कि मंदिराजवळील माकडे अतिधीट आहेत, आणि अगदी मोबाईल देखील चोरू पाहतात. तेव्हा ह्या रस्त्यावर चालताना काठी भाड्याने मिळते ती घ्यावी – आधार + संरक्षण टू इन वन.
कच्चा रस्ता संपला, कि लगेच डावीकडे एक मोठी शिळा दिसते. हि अनुपान शिळा, जिथे गोरक्षनाथांनी परशुरामांना तपश्चर्येसाठी प्रेरित केले. तसेच ८४ सिद्ध प्रकट झाले ते देखील इथेच.पावसाळ्यात ह्या शिळेवर शेवाळ्याचे साम्राज्य होते, त्यामुळे शिळेवरच्या छोट्याश्या मंदिराच्या दर्शनासाठी जाताना खूपच जपून जावे लागले. शिळेच्या खाली सात मातृकांचे स्थान आहे, तेव्हा चपला घालून शिळेवर जाऊ नये.
पुढे उजव्या हाताला एक जुने बांधीव तळे आहे. जुन्या काळी कदाचित वापरात असेलही, पण आता वापरायोग्य दिसले नाही.
हा रस्ता पुढे त्र्यंबकेश्वर वरून येणाऱ्या पायऱ्यांना जोडला जातो. हे ठिकाण नीट लक्षात ठेवावे, कारण परतताना जर का पुढे निघून गेलात, तर बाकी पायऱ्या उतरत थेट त्र्यंबकेश्वरला जाल, आणि गाडी दूर राहील!
पायऱ्या अतिशय उत्तम स्थितीत आहेत. बाकी उंचावरच्या देवस्थानांकडे असतात तशीच छोटी चहा-भजींची दुकाने मध्ये मध्ये लागतात. थोड्याच वेळात आपण मंदिरात पोहोचतो.
सर्वात वर दोन रस्ते लागतात. डावीकडील बांधीव रस्ता गंगाव्दारला जातो. इथे एक छोटेसे मंदिर आहे, आणि गोदावरी एका गोमुखातून निरंतर प्रकट होत असते. येथील पाणी घरी पूजेसाठी आणण्यासाठी खाली छोटे कॅन देखील मिळतात.
शेजारच्या काही मंदिरांचे दर्शन घेऊन पुन्हा चपला घालून आता उजवीकडील कच्च्या रस्त्यावर वळलो. येथे काही पुरातन मंदिरे आहेत, पण रस्ता थोडा बिकट आहे.
प्रथम आपल्याला अहिल्या-गौतम ऋषी गुंफा लागते, जिथे गौतम ऋषींनी स्थापलेली १०८ शिवलिंगे आहेत.
गुंफेत जाण्याचा दरवाजा अगदी लहान आहे, आणि आत उभे राहण्यास देखील जागा नाही. पण स्वच्छता मात्र छान आहे.
येथून उतरल्यानंतर पुढे मार्गस्थ झालो. पुढे गोरक्षनाथ गुंफा आहे, ज्यात गुरु मच्छिंद्रनाथांच्या पादुका आणि गहिनीनाथांचे तपश्चर्यास्थळ आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आणि मोठे बंधू निवृत्तीनाथ ह्यांना गहीनीनाथांकडून दीक्षा येथेच मिळाली.
गोरक्षनाथ गुंफा ह्या रस्त्याच्या शेवटी लागते. आतील लहानगे तपस्या स्थळ जेमतेम ३ फूट बाय चार फूट असेल. पण अतिशय पवित्र जागा आहे, आणि नाथांच्या पवित्र गुंफेत अंतरात्म्याची सतार छेडली गेली नाही तरच नवल.
शेजारीच गुप्तगंगा म्हणून स्थान आहे, जिथे एक शिवलिंगावर डोंगरातून झिरपणाऱ्या पाण्याचा थेंबेथेंबे अभिषेक निरंतर चालू आहे.
हि सर्व ठिकाणे करून आम्ही पुन्हा जायच्या रस्त्यावर लागलो. पुन्हा त्या निसरड्या रस्त्यावरून जीव जपत गाडीपर्यंत आलो आणि प्रसन्न मनाने त्र्यंबकेश्वरला परतलो.
आपण तीर्थक्षेत्रे पाहतो खरी, पण तिथली मूळ स्थाने धुंडाळायची विसरतो. पण कुठल्याही क्षेत्रातील मंदिर हे सर्वात शेवटचे प्रकटीकरण असते, तिथपर्यंतचा प्रवास हा असल्या मूळ स्थानांनी झालेला असतो.
तुम्हीसुद्धा शक्य झाल्यास गंगाव्दार व आजूबाजूच्या मंदिरांस नक्की भेट द्या. रस्ता थोडा अवघड आहे, त्यामुळे अति लहान मुले आणि वृद्ध ह्यांनी पर्वताखालूनच दर्शन घेतलेले बरे होईल.