१७. पिंगळा नामक गणिका
पिंगळा नावाची गणिका शरीर सुखाचा व्यवसाय करीत होती. तारुण्यकाळी निसर्गदत्त सौंदर्यामुळे तिने भरपूर कमाई केली. पण वृद्धापकाळामध्ये कोणी तिच्याकडे येईनासे झाले. एकेकाळी इतक्या प्रसिद्ध असलेल्या पिंगळेला ‘आज कोणी येईल का’ हा विचार अतिशय क्लेशदायक होऊ लागला. तिला जाणीव झाली की तरुणपणामध्ये जर मी शरीरसुख आणि धनाच्या मागे न लागता परमेश्वराच्या मागे लागले असते तर आज मी अशी दु:खात नसते.
तिला नैराश्यातून वैराग्य प्राप्त झाले, व ती साधना मार्गाला लागली.
पिंगळा शिकवते की
अ. नैराश्यातून देखील देवाकडे जायचा रस्ता सापडू शकतो.
ब. पैसा हे सुख मिळवायचे एक अशाश्वत साधन आहे, पण ते मुख्य साध्य नव्हे.
क. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर परमात्म्याची साधना करणे पुढे सुखाचे कारण बनते.
१८. टिटवी
टिटवी हा एक लहान आकाराचा पक्षी आहे. जेव्हा या छोट्या पक्ष्याच्या तोंडी मोठा मासा सापडतो, तेव्हा बाकीचे मोठे पक्षी टिटवीच्या मागे लागतात. झोंबाझोंबी करून तिच्या तोंडचा मासा खेचू पाहतात, आणि जेव्हा तो मासा तिच्या कडून हिरावला जातो, तेव्हाच तिला बाकी पक्ष्यांकडून शांती मिळते.
टिटवी शिकवते, कि ऐहिक साधने दु:खं आणतात. जितके भौतिक गोष्टींच्या मागे धावाल तितकेच शत्रू निर्माण कराल. साधेपणाने गरजेएवढे कमावून आयुष्य सुखाने काढता येते.
१९. लहान बाळ
लहान बाळ निष्पाप असते. त्याचे हास्य निरागस असते, त्याच्या वागण्यामध्ये भूतकाळाच्या अनुभवांचे ओझे नसते. न काल झालेली शिक्षा त्याच्या ध्यानीमनी असते, न उद्याची काळजी. लहान बाळ नेहमी वर्तमानकाळात संपूर्णपणे जगत असते, प्रत्येक नवीन क्षणापासून शिकत असते.
लहान बाळ आपल्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ यामध्ये न गुरफटता वर्तमानकाळ उत्कटतेने जगण्याचा धडा देते.
२०. बांगड्या
एका कुमारिकेच्या घरी पाहुणे आले होते. त्या कुमारिकेने छान हात भर बांगड्या घातल्या होत्या. त्यांचा पाहुणचार करताना स्वयंपाक घरात बांगड्या एकावर एक आपटून फार आवाज करू लागल्या. त्या मुलीने एक एक करून बांगड्या तोडण्यास सुरुवात केली. शेवटी दोनच बांगड्या राहिल्या, तरीही त्या आवाज करत होत्या. अखेरीस जेव्हा तिने केवळ एक बांगडी शिल्लक ठेवली, तेव्हा ती शांततेत स्वयंपाक करू शकली.
बांगड्या शिकवतात, कि शांतता आणि साधना हि एकट्यानेच करणे शक्य आहे. कळपात राहून गोंगाट होतो, मूळ काम बाजूला राहते.
२१. लोहार
एकदा एक लोहार धनुष्यासाठी लागणारे बाण बनवत होता. चांगले बाण बनवणे अतिशय चिकाटीचे आणि एकाग्रतेचे काम आहे. तो लोहार बाण बनवण्यात इतका एकाग्र आणि मंत्रमुग्ध होऊन गेला, कि बाजूच्या रस्त्यावरून राजाची मिरवणूक निघून गेली ती देखील त्याला जाणवली नाही.
लोहार शिकवतो, कि शांतता, सोयी, या गोष्टी साधनेसाठी गरजेच्या नाहीत. एखाद्या बाणाच्या टोकासारखी तीक्ष्ण एकाग्रता साधकाला जगाचा विसर पाडते.
२२. सर्प
सर्प कधी टोळक्याने हिंडताना दिसत नाहीत. जंगलात फिरताना नेहमी एकएकटे दिसतात. सर्प कधी एकाच ठिकाणी वास्तव्य करीत नाहीत. शांतपणे सरपटत जिथे जागा मिळेल तिथे राहतात. जेव्हा शरीर जीर्ण होते, तेव्हा सर्प कात टाकतात आणि नवीन कात धारण करतात.
सर्प आपल्याला संन्याश्याचे जिणे शिकवतो : एकटे रहा, फिरते रहा, आणि देहाच्या प्रेमात अडकू नका.
२३. कोळी
कोळी स्वत:मधून तंतू काढून त्याचे जाळे विणतो. त्या जाळ्यात जे कोणी कीटक अडकतील ते त्याचे खाद्य बनतात, त्या जाळ्यातच तो परीवार वाढवतो. आणि अंती ते जाळे स्वत:च गिळून टाकतो.
कोळी आपल्याला शिकतो, कि
अ. जग हे परमात्म्याने विणलेले जाळे आहे, जे एक दिवस पुन्हा त्यामध्येच विलीन होणार आहे. तेव्हा तुमचे लक्ष कोळ्याकडे – अर्थात परमात्म्याकडे ठेवा, जाळ्याकडे नको.
ब. आत्मा हा एखाद्या कोळ्यासारखा प्रत्येक जन्मामध्ये स्वत:चे विश्व उभे करतो, त्या मध्ये खेळतो. पण शेवटी मृत्युच्या वेळी आत्मा त्याने विणलेले जाळे त्याचे तो काढून घेतो.
२४. भ्रमर
भ्रमर कीटक हा इतर छोट्या कीटकांना धरून आणून त्यांना जाळ्याच्या कोशात विणतो. ह्या बंदी किटकाला भ्रमर रोज डंख करतो. या प्रक्रियेत त्या बंदी किटकाला भ्रमराची इतकी भीती मनात ठासते, कि ते कायम त्याचाच विचार करत राहतात. रोजच्या डंखांनी आणि कायमच्या विचारांनी शेवटी तो कीटक सुद्धा भ्रमर बनूनच बाहेर पडतो.
भ्रमर शिकवतो, की
अ. आपले विचार आपले भविष्य ठरवते.
ब. शिष्याच्या मनी जर सदैव गुरुचाच विचार असेल, आणि सतत ध्यानी मनी गुरु ठेवून असेल, तर एक दिवस शिष्य स्वत: गुरु रूप प्राप्त करतो.
One Comment Add yours