१. पृथ्वी:
शेतकरी दर वर्षी जमीन नांगरतो, नद्या पात्र रुंदावत समुद्राकडे धावतात, झाडे स्वतःची मुळे जमिनीत खोल रुतवतात. सर्व जीवसृष्टी रोज पृथ्वीला पायदळी तुडवते. पण स्वतःवर अश्या यातना करणाऱ्यांना देखील पृथ्वी भरभरून देते.
पृथ्वी हि आपल्याला सहनशीलता आणि परोपकार शिकवते.
२. वायू:
वायू सर्वत्र आहे, आणि जिथे आहे तिथले रूप घेतो. समुद्रकिनारा, देवघर, हिरवेगार शेत, जंगल, प्रत्येका ठिकाणी वायू तेथील गुण उचलतो आणि वेगळा भासतो. पण त्या ठिकाणाचे गुण तो तिथेच सोडतो. स्वत:ला कायमचे कोणतेही गुण लावून घेत नाही. त्याचे मूळ शुद्ध रूप तो कधीच बदलत नाही.
वायू आपल्याला शिकवतो कि कोणतीही परिस्थिती आली तरी आपल्या मूळ रुपाची जाणीव कधीच सोडता कामा नये.
३. आकाश:
अ. जमिनीवर काहीही घडामोडी घडल्या, तरी आकाश काही त्याचे अंतर बदलत नाही. पृथ्वी वर काहीही घडो, आकाश त्याच्या ठिकाणी स्थित राहते. आकाश आपल्याला ‘अलिप्तता’ शिकवते.
ब. आकाश अमर्यादीत आहे. कधी ढग आले, कधी धुके पसरले, तर ते दिसेनासे होते, पण म्हणून संपत नाही. जमिनीची मोजमापे आहेत, नकाशे आहेत, पण आकाशाचा जितका धांडोळा घेत जाऊ तितके अजून सापडत जाते. तसेच आपल्या अंतरात्म्याचे आहे. दृश्य सृष्टीला अंत आहे, पण स्वत:मध्ये जितके शोध घेत जाल तितक्या ज्ञानाच्या कक्षा अजून खोल होत जातात. अश्या प्रकारे आकाश हे आपल्याला आत्म्याची अथांगता शिकवते.
४. जल:
पाणी हे जीवन आहे. आजही एखाद्या परग्रहावर जीवसृष्टी असेल का याचा शोध ‘तिथे पाणी आहे का’ या प्रश्नाने सुरु होतो, इतके पाण्याचे महत्त्व आहे. आकाशातून पाणी बरसते, किंवा नदी उगम पावते, ते पाण्याचे मूळ रूप. हे मूळ रूप नेहमी पवित्र, मधुर, जीवनदायी असते. पुढे त्यात बाकी गोष्टी मिसळत गेल्या कि पाणी त्याचे गुणधर्म बदलते.
जल आपल्याला शिकवते कि आज एखादी व्यक्ती कशीही जरी असेल तरी प्रत्येकाचे मूळ रूप हे पवित्रच असते.
५. अग्नी:
अग्नी सर्व नाशिवंत गोष्टींना भस्म करून शेवटी फक्त शाश्वत गोष्टी शिल्लक ठेवतो. कोरीव लाकूड असो किंवा सरपणाच्या काटक्या, त्यांचा शेवट हा आगीत समानच असतो. सोने आणि इतर धातू अग्नीमुळे तेजस्वी होतात, त्यांच्या मधले दोष जळून जातात.
अग्नी आपल्याला शिकवतो कि साधकाने स्वत:समोर येणाऱ्या सर्व गोष्टी प्रखरतेने पडताळून त्यांच्या मूळ रुपात पहाव्यात. वरील वर्खाला न भुलता मूळ गाभा ओळखण्यास शिकावे.
६. चंद्र
अमावास्येपासून दररोज चंद्र बाळसे धरत जातो, एकेका कलेने वाढत जाऊन पौर्णिमेला छान गरगरीत गोंडस रूप धारण करतो. पण नंतर हळूहळू तो ह्या कला गमावत जातो, आणि पुढच्या पंधरा दिवसांत मिळवलेले सुंदर रुप पूर्णपणे घालवतो. पण म्हणून काही तो दु:खात लोटला जात नाही. एखाद्या मनुष्यावर अशी वेळ आली असती, तर श्रीमंतीतून दारिद्र्यामध्ये, सुखातून दु:खामध्ये लोटला गेल्यानंतर तो नैराश्याच्या गर्तेत सापडला असता. पण स्वत: चंद्र मात्र काहीही परिणाम करून घेत नाही.
चंद्र आपल्याला शिकवतो कि वाढ-क्षती ह्या केवळ देहाच्या अवस्था आहेत, त्यामध्ये गुंतून पडू नये.
रामदासस्वामींचा एक श्लोक याच अर्थाने सांगतो:
देहेरक्षणाकारणें यत्न केला। परी शेवटीं काळ घेउन गेला॥
करीं रे मना भक्ति या राघवाची। पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥
७. सूर्य:
वर्षभर सूर्य स्वतःच्या तेजाने आर्द्रतेचा साठा करतो, पण पावसाळ्याच्या वेळी हि सर्व आर्द्रता पृथ्वीवर झोकून देतो. ‘हे मी कमावलंय’ असं म्हणून स्वत:कडेच ठेवत नाही.
तसेच मनुष्याने स्वबळावर संचय करावा, आणि योग्य वेळी ते जनांमध्ये वाटावे.
८. कबुतर:
एक कबुतराचे जोडपे आकाशामध्ये विहार करीत होते. वरून त्यांना दिसले की आपली पिल्ले पारध्याच्या जाळ्यात अडकली आहेत. पालकाच्या मायेने त्या कबुतरांनी पिल्लांकडे झेप घेतली खरी, पण ते स्वत:सुद्धा त्या जाळ्यात गुरफटून पडले.
कबुतर आपल्याला वैराग्यवृत्तीचे महत्त्व शिकवते. अतिलालसा हि शेवटी नाशास कारणीभूत ठरते.
दत्तगुरूंच्या पुढील आठ गुरूंची माहिती पुढच्या भागामध्ये!
One Comment Add yours