शुक्रवार दिनांक २७ जुलै, २०१८ रोजी ह्या वर्षीची गुरु पौर्णिमा संपन्न होत आहे. भारतीय अध्यात्मामध्ये गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘गुरु’ चे अस्तित्व प्रत्यक्ष किंवा अगदी काल्पनिक जरी असले तरी देखील शिष्याच्या प्रगतीस कारणीभूत ठरते.
महाभारतामध्ये एकलव्याने द्रोणाचार्यांना गुरु मानले, त्यांची प्रतिमा बनवली आणि अंत:प्रेरणेने अर्जुनापेक्षाही वरचढ धनुर्विद्या शिकला. जिथे द्रोणाचार्यांनी एकलव्याला पाहिले देखील नव्हते, आणि ज्यांनी केवळ स्वत:चा शिष्य सर्वोत्तम राहावा म्हणून त्याचा अंगठा देखील कापून घेतला, अश्यांच्या केवळ प्रतिमेने एकलव्याला कसे काय शिकवले? याचे उत्तर म्हणजे, जे शिकण्याजोगे आहे ते मूलत: अस्तित्वात आहेच, फक्त गुरुप्रती असलेल्या नम्रतेच्या आणि शिष्यवृत्तीच्या भावनेने ते प्राप्त होऊ शकले.
श्री दत्त हि प्रत्यक्ष गुरुमाऊली. ‘गुरु’ अशी उपाधी लागणारे एकमेव असे दत्तगुरू हे कोणाचे शिष्य? असे म्हणतात, कि स्वत: दत्तगुरूंना एक-दोन नव्हे, तर चोवीस गुरु होते. निसर्गामधून आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामधून ज्यांनी ज्यांनी काही शिकवलं, त्यांना गुरु म्हणावं याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे चोवीस गुरु.ह्या चोवीस गुरुंची यादी जरी बऱ्याच ठिकाणी असली, तरी त्यांचे अर्थ प्रत्येकाने वेगवेगळे लावलेले आहेत. “जगी पाहता देव कोट्यानुकोटी। जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥” ह्या उक्तीस साजेल अशी बरीच उदाहरणे आहेत. त्यामुळे मी हे अर्थ माझ्या विचारांतून लिहित आहे.
आपण पुढल्या तीन भागांमधून दत्तगुरूंच्या चोवीस गुरुंबद्दल माहिती घेऊयात.
https://kahitari.com/2018/07/23/दत्तांचे-गुरु-भाग-१/
https://kahitari.com/2018/07/24/दत्तांचे-गुरु-भाग-२/
https://kahitari.com/2018/07/25/दत्तांचे-गुरु-भाग-३/