गुंतवणूक कधी सुरु करावी? आपल्याकडे नोकरी लागली, तर पहिले काही पगार मित्रांना पार्टी, नवीन मोबाईल, गर्लफ्रेंड(स) वैगेरे सन्मार्गी लागतात. नंतर एखाद्या कार किंवा बाईक चा हफ्ता चालू होतो. लग्न – मुलं झाल्यावर तर पगाराला इतके फाटे फुटतात कि कसलं सेव्हिंग नि कसलं काय? पण हळू हळू खर्चापेक्षा कमाई पुढे जाते, आणि मग मनुष्य गुंतवणुकीचा विचार करू लागतो.
गुंतवणूक अशी पुढे ढकलत गेलो, तर आपण स्वत:च्या भविष्याचे अक्षम्य असे नुकसान करत असतो. हे समजण्यासाठी दोन मित्राचं उदाहरण बघूयात.
अजय आणि विजय हे दोन जिवलग मित्र. एकाच वर्षात जन्मलेले, शाळेपासून एकाच वर्गात. वीस वर्षांचे झाल्यापासून दोघेही पैसे कमावू लागले. अजयने काहीही शिल्लक न ठेवता सर्व कमाई उडवणे चालू ठेवले. विजय देखील काही फार वेगळा नव्हता, पण त्याने वर्षाला १०,००० एका १२% द.सा.द.शे. च्या गुंतवणुकीत गुंतवायला सुरुवात केली.
हळू हळू दोघांचेही मार्ग वेगळे झाले, लग्न झाले, संसार फुलले. वयाच्या तिशीला दोघेही शाळेच्या ‘री-युनियन’ ला भेटले. विजयने अजयला त्याची गुंतवणुकीची पद्धत सांगितली, आणि हे ही सांगितलं कि ह्यापुढे वाढत्या खर्चामुळे नवीन गुंतवणूक बंद केली आहे. अजयला स्वत:ची काहीच गुंतवणूक न झाल्याची लाज आणि भविष्याची काळजी असं दोन्ही वाटलं, आणि त्याने निर्धार केला कि आता दर वर्षी गुंतवणूक करायचीच, काय वाट्टेल ते होवो. ते सुद्धा दुप्पट, वार्षिक २०,००० रुपये! वयाच्या साठीला दोन्ही मित्र रिटायर झाले, आणि त्यांनी आपापली गुंतवणूक काढून घेतली.
वरची गोष्ट आकड्यांमध्ये मांडूयात.
विजयची गुंतवणूक: वय २० ते २९, दर महिना १०,०००, पुढे साठीपर्यंत काहीच नाही.
अजयची गुंतवणूक: वर ३० ते ५९, दर महिना २०,०००.
दोघांनाही मिळालेला परतावा: १२% द.सा.द.शे. सर्व वर्षांसाठी.
काय वाटतं, कोणाकडे जास्त संपत्ती असेल? अजयने विजय पेक्षा दुप्पट गुंतवणूक केली, तेही तिप्पट कालावधीसाठी! पण नवलाची गोष्ट अशी, कि तरीही विजयची संपत्ती हि अजय पेक्षा एक पंचमांश जास्तच असेल!
अजयची संपत्ती: ५४ लाख
विजयची संपत्ती: ६६ लाख!
१२% परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत विजयला २०% जास्त संपत्तीमिळाली. जर ह्याच गुंतवणूकीने १५% परतावा दिला असता, तर हा फरक ७५% असता, आणि जर १८% परतावा मिळाला असता, तर हा फरक दीडपट असता! ‘चक्रव्याढ व्याज’ ह्या जादुई गोष्टीमुळे विजयची फार आधी केलेली गुंतवणूक अजयच्या कैकपट परंतु उशिराने केलेल्या गुंतवणुकीच्या फार पुढे निघून गेली!या गोष्टीचा मतितार्थ एवढा, कि जर का एखाद्याने लवकरात लवकर गुंतवणूक सुरु केली नाही, आणि ती पुढे पुढे ढकलत राहिला, तर त्याचे कायमचे नुकसान होऊ शकते. बाकी सर्व काही नंतर विकत घेता येऊ शकते, आणखी ऍडव्हांस मोबाईल येईल, आणखी मॉडर्न वाहने येतील, पण आता जर खर्च केलात तर नंतर दुप्पट गुंतवणूक आणि तिप्पट वेळही तुम्हाला वाचवू शकणार नाही!
एक लक्षात घ्या, कि अजय आणि विजय, दोघांनी फक्त ‘बचत’ केली नाही, तर उत्तम परतावा देणारी गुंतवणूक केली. बचत आणि गुंतवणूक यातील फरक पुढच्या पोस्टमध्ये!