एक दिवस एक माणूस समुद्रावर फिरत होता. त्याला एक मुलगा दिसला, जो किनाऱ्यावरून काहीतरी उचलून समुद्रात टाकत होता. त्या माणसाने जवळ जाऊन विचारले: “काय चाललंय रे?”
त्या मुलाने उत्तर दिलं: “हे स्टारफिश भरतीमध्ये किनाऱ्यावर वाहून आलेयत, आणि आता ओहोटी लागलीये. मी एक एक करून यांना परत समुद्रात टाकतोय.”
अख्खा किनारा स्टार फिशने भरला होता. त्या माणसाने हसून विचारलं: “तू आजूबाजूला पाहिलंस का, किती मासे वाहून आलेयत? तू एकटा काय फरक पाडणार आहेस?”
शांतपणे ऐकून घेऊन त्या मुलाने पुन्हा एक मासा उचलला, समुद्रात टाकला, आणि त्या माणसाला प्रसन्न उत्तर दिले: “मी त्या माश्याला फरक पाडला.”
स्टारफिश ची हि प्रेरणादायी कथा “The Star Thrower” (or “starfish story”) ह्या लॉरेन ऐज्ली नामक लेखकाने १९७० च्या सुमारास लिहिली. तेव्हापासून हि कथा जगप्रसिद्ध आहे. आपण विचार करतो, कि आपल्या एकट्यामुळे काय फरक पडणार आहे, एवढ्याश्या कामाने काय होणार आहे. असल्या शंकांना हि कथा योग्य उत्तर देते.
कथा आठवण्याचं कारण म्हणजे, मला ह्या कथेचा अनुभव प्रत्यक्ष घेण्याचा योग आला. ‘मुरुडेश्वर, कर्नाटक’ येथे समुद्रकिनारी फिरत असताना मी पहिले कि ‘रापण’ आली होती. रापण म्हणजे जेव्हा कोळी बंधू जाळ्यामध्ये मासे पकडून समुद्रावर आणतात. तिथेच वाटे करून लिलाव होतात, आणि तेथील मासे विक्रेते आणि पर्यटक ते ताजे पकडलेले मासे घेतात. रापण पाहणे हा एक मस्त अनुभव असतो. मासेमारी करणाऱ्या गावांमध्ये एकदा तरी हा अनुभव तुम्ही आवर्जून घ्या.
हि रापण बघताना मी पाहिलं कि माश्यांची बरीच छोटी पिल्ले हि जाळ्यात ओढली गेली होती. अतिशय लहान असल्यामुळे त्यांना बाजारात काही किंमत नव्हती. पण त्यांच्या जिवंत राहण्याबद्दल सुद्धा लोक उदासीन होते. मी जरी मत्स्य पाककृतींचा चाहता असलो तरी हि निर्बुद्ध हत्या मला पाहवेना. त्या मुळे मी एक एक करून हे मासे समुद्रात टाकण्यास सुरुवात केली. डोक्याला बांधलेल्या गो-प्रो नामक ऍक्शन कॅमेऱ्याने हि घटना छान टिपली. हा त्या घटनेचा व्हिडियो, वरील कथेसोबत.