बुद्धांकडे कोणी काही प्रश्न विचारायला आला, तर बुद्ध त्याला सांगायचे ‘थांब, इथे दोन वर्ष रहा. माझ्या समीप दोन वर्षे शांततेत घालाव. मग हवं ते विचार’.
एकदा एक मौलुंगपुट्ट म्हणून महान विचारवंत बुद्धांकडे आले. त्यांनी प्रश्नांची मोठ्ठीच जंत्री आणली होती. बुद्धांनी त्यांचे प्रश्न ऐकून घेतले, आणि त्यांना विचारलं “मौलुंगपुट्ट, तुम्हाला खरंच उत्तर हवं आहे? तुम्ही त्याची किंमत मोजू शकाल का?”
मौलुंगपुट्ट वयाने मोठे होते. त्यांनी विनयतेने म्हटले: “माझ्या आयुष्याचा अंत निकट आहे. मी माझं उभं आयुष्य ह्या प्रश्नांच्या शोधात व्यतीत केलं आहे. खूप मार्ग सापडले, पण उत्तर काही गवसले नाही. प्रत्येका उत्तराने अजूनच प्रश्न उत्पन्न केले. कोणत्याच उत्तराने समाधान झाले नाही. बोला, तुमची काय किंमत आहे? जी मागाल ती किंमत द्यायला मी तयार आहे. मला फक्त हे प्रश्न एकदाचे सोडवायचे आहेत. डोळे कायमचे मिटण्याआधी मला ह्यांची उत्तरे हवी आहेत.”
बुद्ध म्हणाले: “छान! लोकांना उत्तरे हवी असतात, पण किंमत मोजायला मात्र फारसे कोणी तयार नसतात. म्हणून आधी विचारले. माझी किंमत आहे, तुम्ही दोन वर्षे शांत बसणे, हि . माझ्याजवळ दोन वर्षे शांत बसा, काहीही न बोलता. एकदा का दोन वर्षे झाली, कि मीच म्हणेन तुम्हाला: ‘विचारा काय हवे ते’. माझा शब्द आहे, सर्व शंकांचे निरसन करेन. पण दोन वर्षे संपूर्ण शांतता. आहे मंजूर?”
मौलुंगपुट्ट विचारात पडले. दोन वर्षे तर फार झाली, आणि यांनी शब्द फिरवला तर? त्यांनी पुन्हा खात्रीदाखल विचारले “दोन वर्षांनी नक्की उत्तरे मिळतील?”
बुद्ध उत्तरले: “खात्री बाळगा, विचारलेल्या प्रश्नांची नक्की उत्तरे मिळणार. हां पण तुम्ही काही विचारलेच नाहीत, तर कशाचे उत्तर देणार?”
बुद्धांचे बोल ऐकून जवळच झाडाखाली साधनेला बसलेला एक भिक्षू मोठमोठ्याने हसू लागला. मौलुंगपुट्टने चमकून विचारले: “हे का बरे हसू लागले?”. बुद्ध म्हणाले “त्यांनाच विचारा”.
भिक्षूंनी हसत हसत उत्तर दिले: “महाशय, आत्ताच काय ते विचारून घ्या. मला पण असंच फसवलं होतं ह्यांनी. हे दोन वर्षांनी लाख उत्तरं देतील हो, पण मुळात प्रश्न तर शिल्लक राहिले पाहिजेत! मी पण दोन वर्षं शांततेत काढली. आता हे मला वारंवार टोचतात:’विचार प्रश्न, विचार प्रश्न’ म्हणून. पण ह्या दोन वर्षांच्या शांततेनंतर सर्व प्रश्न मावळले, आणि उत्तरे प्रकटली. म्हणून सांगतो, आत्ताच काय ते विचारा, नंतर विचारायला काहीच शिल्लक राहणार नाही.”
पुढली दोन वर्ष मौलुंगपुट्ट बुद्धांजवळ राहिले. बुद्धसंगतीत भान हरपले, आणि अंतर्बाह्य शांततेत मग्न झाले. ज्या दिवशी दोन वर्षे पूर्ण झाली, तेव्हा बुद्ध न विसरता त्यांच्या भेटीस आले, आणि त्यांना साधनेतून उठवले. प्रेमाने विचारले: “मौलुंगपुट्ट, माझे शब्द मी कधीच फिरवत नाही. आता विचारा तुमचे प्रश्न.”
मौलुंगपुट्ट हसू लागले, आणि म्हणाले: “ते भिक्षू बरोबर सांगत होते. माझ्याकडे आता काहीच प्रश्न नाहीत. उत्तर मिळालंय मला.”
उत्तर कधी दिलं जात नाही, प्राप्त केलं जातं. प्रश्नांच्या गाभ्यातच उत्तर दडलेलं असतं, गरज आहे ते स्वत: शांत होऊन त्याला प्रकट होऊ देण्याची.
बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
(ओशो यांच्या साहित्यातून साभार)