एके काळी मराठी टायपिंग म्हणजे करियर चॉईस असायचा. नेहमीचा कीबोर्ड सोडून मराठी कीबोर्ड शिकणं, हे एखादी नवीन भाषा शिकण्याइतकंच दिव्य होतं . पण हळू हळू टाईप ऍज यू स्पेल कीबोर्ड येऊ लागले, आणि मराठी टायपिंग सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले. तुम्हाला जर तुमचे विचार स्पेलिंगनुसार टाईप करता आले तर तुमच्या मातृभाषेत ते प्रकट होऊ शकतात, अगदी सहजतेने. टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली, तरी ह्या कीबोर्डना जनमान्यता मिळालेली दिसत नाही, निदान मराठी मध्ये तरी नक्कीच नाही.
माझ्या सर्व मराठी कॉन्टॅक्ट्सपैकी अतिशय निवडक लोक देवनागरी लिपीत लिहितात. इतर जण आपले इंग्रजीतच मराठी टाईप करून दोन्ही भाषांवर सूड उगवतात.
पण माझी एक वेडी समजूत आहे, कि गोलमटोल देवनागरी अक्षरांत, डोक्यावर छान रेषेचा पदर घेऊन दिसत नाही तोपर्यंत मराठी लिहिली किंवा वाचली असं वाटतच नाही. थोडे कष्ट घेऊन जर का मी संपूर्ण भाषा वापरू शकत असेन, तर तसे करणे हे माझे कर्तव्यच आहे. ह्या पोस्ट मध्ये फोन व कॉम्प्युटर वर मराठी कसे लिहू शकाल, याबद्दल थोडेसे.
अँड्रॉइड फोन वापरत असाल किंवा विंडोज कॉम्प्युटर, तर गूगल बाबाने तुमचे जिणे फारच सोपे केले आहे. गूगल चा मराठी कीबोर्ड डाउनलोड करून नीट इंस्टॉल करा. याला काहीही दैवी बुद्धिमत्ता लागत नाही. एक पाच मिनिटांच्या आत तुमचा फोन किंवा कॉम्प्युटर मराठी टायपिंगसाठी तयार असेल.
आयफोन किंवा आयपॅडवर मराठी टाईप करणं तसं दिव्यच आहे, कारण ऍपल कंपनीला मराठी भाषेचं विशेष काही पडलं नाहीये. हिंदी भाषेसाठी टाईप ऍज यू स्पेल कीबोर्ड उपलब्ध आहे, पण मराठी साठी मात्र तो विचित्र कुठल्याही कीज कुठेही असलेला कीबोर्ड उपकाराच्या राशी म्हणून दिलेला आहे.
तर ऍपल च्या माध्यमांवर मराठी लिहायचं कसं ?
- अँड्रॉइड वर गूगल कीबोर्ड छान टाईप करता करता मराठी शब्द सुचवतो. दुर्दैवाने हा कीबोर्ड ऍपलवर उपलब्ध नाही
- ऍपलने दिलेला चित्रविचित्र कीबोर्ड शिका
- हिंदी ट्रान्सलिटरेट कीबोर्ड वापरा, पण बऱ्याच वेळा ह्यात काही मराठी शब्द टाईप करणं अशक्यप्राय होतं
- keynounce कंपनीचे मराठी टायपिंग सॉफ्टवेयर विकत घ्या (किंमत साधारण २५०-३०० रुपये). ह्या सॉफ्टवेयरने मराठी टायपिंग बरेच सुसह्य होते. ह्याच्या मोफत व्हर्जन मध्ये खूप मर्यादा येतात, आणि फुल व्हर्जनला इंटरनेट कनेक्शन लागते. अँड्रॉइडच्या कीबोर्ड सारखं हे कीबोर्ड ऑफलाईन चालू शकत नाही.
- गूगल इनपुट साधनांची हि लिंक वापरा. हि वापरून तुम्ही मोठ्या पोस्ट लिहू शकता
https://www.google.com/intl/mr/inputtools/try/
माझा अनुभव: क्र.५ मध्ये दिलेली लिंक वापरून हि पोस्ट टाईप केली आहे. पण व्हॉट्सऍप्प किंवा मेसेज मध्ये मराठी टाईप करायचं असेल, तर थोडे पैसे मोजून क्र. ४ मधले सॉफ्टवेयर वापरणे फारच सोयीचे पडते. इंटरनेट कनेक्शन कमजोर असल्यास मात्र डोक्यास मुंग्या येतात.
अश्या प्रकारे कॉम्प्युटर असो वा मोबाईल, तुम्ही नक्कीच मराठी लिपी वापरून व्यक्त होऊ शकता. वर्षातला एकच दिवस ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ म्हणून उरलेले दिवस इंग्रजीत टाईप करणं थांबवा. तंत्रज्ञान खूप प्रगत झालंय, त्याचा वापर करून मराठी हि देवनागरीतच लिहू, असा संकल्प करुयात.