उन्हाळी सुट्टी आली कि पत्ते कपाटातून बाहेर पडत. दुपारी उन्हामुळे अगदी अंधारी येऊ लागली कि गपचूप चार भिंतीत पोरं कैद असायची. शहरामध्ये झाडाची सावली, थंडगार माळरान असला काही प्रकार नसल्यामुळे बैठे खेळ हीच काय ती दुपारची कामे. त्यात ते पत्ते रोज हाताळून त्यांच्या एकेक पानाशी इतकी ओळख व्हायची कि समोरच्याच्या हातातले पत्ते पाठमोरे पाहून कोणाचा कान दुमडलाय, कुठल्या पानाची डिजाईन थोडी चुकलीये असल्या बारीक सारीक नोंदींनी आम्ही पत्ते ओळखायला शिकायचो. जास्तच वेळा पकडले गेलो तर मग नवीन जोड यायचा आणि पुन्हा सगळे समान पातळीवर यायचे.
त्या वयात ‘का’ हा विचार कधी केला नाही. पत्ते बावन्नच का, चारच प्रकार का, जोकर कशाला असतो असले विचार कधी आलेच नाहीत. पण पत्त्यांमागे मोठा विचार दडला आहे. तत्त्वज्ञान आणि गणित याचा उत्तम मेळ पत्त्यांमध्ये साधला गेला आहे. आपण दोन भागांमध्ये पत्त्यांचे अंतरंग जाणून घेऊ.
पत्त्यांचा जोड हा एक वर्ष दाखवतो. कसा?
पत्ते चार प्रकारचे असतात, बदाम, इस्पिक, किलवर, आणि चौकट. एका पत्त्याच्या सेट मध्ये ह्या चार प्रकाराचे प्रत्येकी तेरा पत्ते असतात, आणि एक जोकर.
हे चार प्रकार म्हणजे चार ऋतू:
- शिशिर + वसंत – हिवाळा – डिसेंबर ते फेब्रुवारी
- ग्रीष्म – उन्हाळा – मार्च ते मे
- वर्षा – पावसाळा – जून ते ऑगस्ट
- शरद + हेमंत – पानझडी – सप्टेंबर ते डिसेंबर
हे भारतीय रूप आहे. मूळ पत्त्यांमागे winter, spring, summer, autumn हे चार ऋतू धरले आहेत.वर्षभरात ५२ आठवडे असतात, म्हणजे प्रत्येका ऋतूचे १३ आठवडे. म्हणून पत्त्यांमध्ये प्रत्येक प्रकारचे १३ पत्ते असतात, एक पत्ता सात दिवस दाखवतो. १३ गुणिले ७ गुणिले ४ = ३६४. पण वर्ष तर ३६५ दिवसांचं असतं.म्हणून एक जोकर!
(१३ x ७ x ४ ) + १ = ३६५. एक वर्ष.
अश्या प्रकारे एक पत्त्यांचा जोड हा एक संपूर्ण वर्ष दर्शवतो.
पत्त्यांच्या एकूण मांडणीत सुद्धा मोठे संख्याशास्त्र दडले आहे. तुम्ही जेव्हा एखादा नवीन पत्त्यांचा जोड घेता, तेव्हा पत्ते ज्या क्रमात लागलेले असतात, त्याबद्दल काय वाटतं? तो क्रम आधी कधी दुसऱ्या पत्त्यांच्या जोडाचा पण होऊन गेला असेल का? याबद्दल पुढल्या पोस्ट मध्ये बोलू.