केव्हाची मैफिल रंगवलीये या वाऱ्याने . शांततेचा विचारही मनात येऊ शकत नाही, इतका कान आणि मन व्यापून टाकणारा घोंगावणारा वारा, आणि त्यात समुद्राने लावलेला खर्जातला सूर. अवघा परिसर अगदी या दैवी गुंजेने अगदी व्यापून टाकलाय. वास्तविक गोंगाट म्हटलं कि मन बिथरतं , पण ह्या अनाहत नादाच्या तालासुरात ते देखील टोकदार होऊ पाहतंय, उसळी मारू पाहतंय.
हि रंगलेली मैफिल ऐकायला माझ्याबरोबर बरीच दिग्गज मंडळी आहेत. उंचच उंच माडांच्या रांगा मध्येच एखादी छान जागा गेली कि मनापासून पटली असल्यासारखी माना डोलावाताहेत. वाळू उगाचच इकडून तिकडे केल्यासारखी भुरभूरतेय. मोठमोठे दगड मात्र मैफिलीतल्या तक्के -लोडांसारखे कोणत्याही गायकाचे काही कौतुक नसल्यासारखे रेलून पडलेयत.
खूप दूर काही पर्यटक समुद्रात डुंबताहेत. इतक्या लांबून त्यांचे शब्द काही कळत नाहीयेत, फक्त चित्कार तेवढे ऐकू येत आहेत. आनंदाच्या किंवा दु:खाच्या क्षणी माणूस बहुधा मानवी भाषेवरचे अवलंबित्व सोडतो, फक्त प्राण्यांसारखा चित्कारू शकतो. कमाल म्हणजे असल्या वेळी भाषेविना काही अडत देखील नाही.
सूर्य त्याचं काम इमाने इतबारे करतोय, आणि दिल्या मार्गावर नीट निघालाय. अजून दोन-अडीच तासाने त्याच्या परत पाठवणीचा मोठा सोहळा साजरा होईल, कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट होईल, अवघे कोकण किनारे गजबजतील. पण आता त्याचं कोणाला काही कौतुक नाही, उलट उन्हामुळे बोलच ऐकावा लागतोय. शेवटी योग्य वेळ आल्याशिवाय कोणाचंच कौतुक होत नाही हेच खरं.