क्रिस्पी कॉर्न

बाजारात कणसाच्या दाण्यांचं १०० ग्राम चं पाकीट २० रुपयांना विकत मिळतं. नुडल्स किंवा तत्सम  रेडी टू इट पदार्थांपेक्षा हे कणसाचे दाणे किती तरी पौष्टिक आहेत. उकळत्या पाण्यात थोडं मीठ आणि कणसाचे दाणे टाकून साधारण १० मिनिटे सुगंध सुटेपर्यंत शिजवले कि झालं.

वास्तविक ताजे उकडलेले गरमागरम दाणे जास्त वेळ पोटाबाहेर राहू शकत नाहीत. पण जर भूकेवर थोडा ताबा मिळवू शकलो तर हेच दाणे पंचतारांकित स्टार्टर्स  होऊ शकतात. अशीच एक रेसिपी : क्रिस्पी कॉर्न .

साहित्य:

  1. कणसाचे दाणे – १ पाकीट – साधारण १०० ग्राम
  2. चवीपुरते मीठ
  3. अर्धा चमचा तिखट मसाला
  4. २ टेबल स्पून मक्याचे पीठ अर्थात कॉर्न फ्लॉअर
  5. अर्धा कांदा बारीक चिरलेला
  6. १ हिरवी मिरची बारीक काप करून
  7. थोडी कोथिंबीर
  8. चाट मसाला

दाणे नीट बुडतील इतकं पाणी तापवा. पाण्याला कढ आला कि कणसाचे दाणे टाका व झाकण ठेवा. ८-१० मिनिटात दाणे शिजतील. सुगंध सुटला कि कळेल कि दाणे तयार आहेत. पाणी गाळून टाका (हे पाणी इतर पदार्थांमध्ये वापरा किंवा झाडांना टाका.)

उकडलेल्या दाण्यांमध्ये कॉर्न फ्लॉअर व थोडं तिखट घालून ढवळा. चुकून जर कॉर्न फ्लॉअर जास्त झालं तर अर्धा -अर्धा चमचा पाणी वाढवा. एकदा का सर्व दाण्यांना पीठाचं छान लेपन झालं कि मध्यम गरम तेलातून पटापट काढा. इथे तीन गोष्टी लक्षात ठेवा.

  1. तेल जास्त गरम झालं तर दाणे पॉपकॉर्न बनू पाहतात, आणि गरम तेलातून बाहेर उड्या मारू लागतात. असं झालं तर लगेच एक थाळी ढालीप्रमाणे कढईवर धरा आणि दाणे उड्या मारणे संपवेपर्यंत धरून ठेवा.
  2. जास्त वेळ तळले तर उकडलेले दाणे सुकून जातात आणि पदार्थ खूप सुका होतो. त्यामुळे दाणे क्रंची झाले कि लगेच काढून घ्या. फार तर २-३ मिनिटे, त्याहून जास्त वेळ झाला कि समजा कि आज दातांना व्यायाम आहे.
  3. तळताना दाणे सुटे पाहिजेत, लाडू किंवा भजी व्हायला नको. म्हणून तळले जाणारे दाणे झारीने ढवळत रहा.

तळलेले कुरकुरीत दाणे टिश्यू पेपर वर काढून तेल टिपून घ्या. प्लेट मध्ये हे तळलेले दाणे घेऊन थोडा बारीक कांदा, लिंबू आणि कोशिंबीर त्यात ढवळा, वरून चाट मसाला भुरभुरा, आणि क्रिस्पी कॉर्न तयार!

 

यावर आपले मत नोंदवा